कराड उत्तरेत 'गुबुगुबु' वाजतंय

Mon 14th Oct 2024 12:17 pm
इलेक्शन फिवर मुळे गावागावात वातावरण निर्मिती

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात इलेक्शन फिवर धुमधडाक्यात सुरू झाला असल्याने उदघाटन आणि भूमिपूजन यांनी जोर धरला आहे.महायुतीचा घटक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत लोकांच्यात मिसळून काय विकासकामे केले आहे याबाबत परिवर्तन यात्रेच्या स्वरूपात माहिती देण्यास सुरुवात केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,कराड उत्तर प्रभारी मनोज घोरपडे,सरचिटणीस किसान मोर्चा रामकृष्ण वेताळ यांनी मतदारसंघात विविध भागांतील कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे.यामुळे विद्यमान आमदारांच्या विरोधात विखुरलेली विरोधकांची फळी गावोगावी एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नाराजी फॅक्टरवर जोर 
 केवळ नाराजी या फॅक्टरवर आमदार विरोधकांकडून कराड उत्तरचे राजकारण ऐनवेळी तापवले जाते हा गेल्या काही निवडणुकीत हमखास वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साधला जात नाही. वर्षभरापूर्वी राज्यात फोडझोडीतून भाजपची सत्ता आली व विरोधकांनी पुन्हा रान तापवायला सुरूवात केली. वास्तविक २०१४ ला राज्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली होती तेव्हाच सक्रिय रहायला व योजना आणि विकास साधायला चांगली संधी होती त्यावेळी ती त्यांनी दवडली. आता जरी भाजप पुन्हा सत्तेत असली व त्यामाध्यमातून या वर्षभरात काही कामे झालेली दिसत असली तरी फोडझोडीच्या राजकारणाची नाराजी जनतेमध्येही तीव्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अॕंटीइन्कम्बसीचा जो मोठा फटका भाजपला बसला आहे ती लाट अजून ओसरलेली नाही. त्यामुळे ही गोष्ट व ऐनवेळच्या कामाचा एवढा परिणाम होईल असे चित्र दिसत नाही . याचा विचार कुणी केलेला दिसत नाही. त्यातच महायुतीत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी स्वतंत्र अशी आहे. पक्षाच्या कार्यक्रमास सारे एकत्र येत असतील तरी खाजगी कुजबूजीतून अंतर्गत मतभेद स्पष्ट जाणवत आहेत व यामुळेच मतदारही संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यमान आमदांवर केवळ नाराजी जास्त आहे हा निर्णायक निवडणूकीचा मुद्दा ठरत नाही. कारण अंतर्गत नाराजी व मतदारांची नाराजी तर सर्वांवरच आहे. विद्यमान आमदार कार्यक्षम नाहीत हे मान्य केले तरी २०१४ ला भाजपची निर्विवाद सत्ता असताना ते तरी कुठे कार्यशील राहीले ?. ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही.

उंब्रज,मसूर,पाल,कोपर्डे,कवठे या मूळच्या कराड उत्तर मधील जिल्हा परिषद गटातील गटा तटाच्या राजकारणाला कंटाळेलले हुकमी शिलेदार गळाला लावत मतदारसंघात अरुण जाधव आणि बाळासाहेब पाटील यांच्यातील २००४ साली झालेल्या लढतीनंतर पहिल्यांदाच गुबुगुबु वाजतंय असं वाटायला लागलं असल्याच्या प्रतिक्रिया जनतेत चर्चेत येऊ लागल्या आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी एकछत्री अंमल स्थापित केला आहे.२००४ वगळता त्यांना फारसा प्रतिकार झाला नसल्याने नेहमी मतविभागणीचा मोठा फायदा होत गेला २०१४ व २०१९ ला धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे या दोघांनीही आपापली ताकत आजमावत लढत दिली परंतु विरोधातील मते दोघांच्यात विभागली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे एक गठ्ठा मतदान आ.पाटील यांना झाले यामुळे त्यांचा विजय सुकर होत गेला परंतु २०२४ ला परिस्थिती भिन्न असून घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या ताब्यात असून सध्या महायुतीच्या सरकारमध्ये दोन नंबरच्या पदावर ते विराजमान आहेत यामुळे कराड उत्तरचे नेमके उत्तर काय याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहेत. 

राग आणि डाग 
 एकंदर राग व डाग यातच कराड उत्तरचं राजकारण कायमचं गुरफटून गेलंय याबाबत मतदार कायमच कुजबुज करीत असतात. कुणावर कुणाचा कसला राग आहे तर कुणावर कसले डाग आहेत. त्यामुळे जनतेला वेगळाच पर्याय दिला व तो स्थानिक असेल तरच काहीतरी वेगळे घडू शकते कारण आजवर मूळ कराड मतदार संघातील कुणाला येथे उमेदवारीच दिली गेलेली नाही. उमेदवारीही बाहेरच्या तालुक्यातील व बंडखोरीही बाहेरच्या तालुक्यातच असेच नेहमी घडलेले आहे. शिवाय या मतदारसंघावर यशवंत विचारांचा पगडा आजही दिसून येतोच हेही वास्तव आहेच. ही वैचारिक , तात्विक , भौगोलिक व सांख्यिक गणिते सर्वच पक्षाच्या श्रेष्ठींनी आजवर विचारातच घेतली गेलेली नाहीत. एकास एक उमेदवार एवढे एकच गणितही पुरेसे ठरणार नाही कारण एण्टीइनकम्बसी मुळे राज्यभरात महायुतीची होवू शकणारी तूट भरून काढायची असेल तर अशा अनेक ठिकाणी जिथल्या तिथल्या साऱ्या गोष्टी व शक्यता विचारात घ्याव्याच लागणार आहेत.

 महायुतीमधील कराड उत्तर बाबत राजकीय भूमिका काय याबाबत मोठा सस्पेन्स असून एकास एक लढत होणार असल्याचे सूतोवाच भाजपच्या नेत्यांनी विविध सभांमधून सांगितले तरी तो एक उमेदवार नक्की कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.काही व्हायरल होणाऱ्या पोस्ट मुळे या गोंधळात भरच पडत आहे.तरीही भाजपच्या मतदार संघ निरीक्षकांच्या घोषणा नुकत्याच झाल्याने याबाबत काही अंदाज राजकीय निरीक्षक बांधू लागले आहेत. यामुळे कोण लढणार आणि भविष्यातील शब्द घेऊन कोण थांबणार याबाबत मतदारांच्यात उत्सुकता आहे.