लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

Sun 31st May 2026 10:45 pm

उंब्रज | प्रतिनिधी

कराड तालुक्यातील चोरे गावाचे सुपुत्र, कराड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तसेच श्री वाग्देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. राजाराम पांडुरंग साळुंखे उर्फ लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रविवारी (दि. ३१ मे) मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाले.

या सोहळ्यास मंत्री मकरंद पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ.मनोज घोरपडे, उदयसिंह पाटील, निर्मला राजाराम साळुंखे-चोरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासातील योगदानाचा विशेष उल्लेख केला. शिक्षणाचा प्रसार, समाजकारणातील सक्रिय सहभाग आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब चोरेकर यांनी उभारलेल्या शैक्षणिक व सामाजिक संस्थांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेला हा पूर्णाकृती पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा व समाजसेवेच्या वारशाचा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास बाळासाहेब साळुंखे-चोरेकर, देवराज पाटील,अजित पाटील,महेशकुमार जाधव, दत्तात्रय साळुंखे यांच्यासह चोरे विभागातील व गावातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

"शिक्षण, समाजकारण आणि ग्रामीण विकासाचा दीपस्तंभ असलेल्या लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या कार्याची प्रेरणा आगामी पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरणार आहे," अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.