सांगली-सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना भाजपची उमेदवारी; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Sun 31st May 2026 11:03 pm

उंब्रज/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा होताच सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

धैर्यशील कदम यांनी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करताना संघटना बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जिल्हाभर प्रभावी नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन आणि प्रचार यंत्रणा सक्षमपणे उभी केली होती. त्याचा परिणाम म्हणून सातारा जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार विजयी झाले. या यशामागे धैर्यशील कदम यांची संघटन कौशल्ये आणि कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क महत्त्वाचा मानला जातो.

राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासूनच धैर्यशील कदम यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंत्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे बोलले जात आहे.

राजकारणाबरोबरच उद्योग क्षेत्रातही धैर्यशील कदम यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्धन ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी कृषी प्रक्रिया, बांधकाम, पेट्रोलियम व्यवसाय आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे प्रशासन, उद्योग आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांचा अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

भाजपने सांगली-सातारा मतदारसंघात धैर्यशील कदम यांच्या रूपाने एक सक्षम आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत उमेदवार मैदानात उतरविल्याची चर्चा आहे. उमेदवारी जाहीर होताच दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून, धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.