रावसाहेब वाळू मिळणार तरी कशी..?

Wed 6th Mar 2024 07:07 pm
रावसाहेब आण्णासाहेब पाकीट घेऊन मूग गिळून बसल्याची तक्रार जनता करीत आहे.चोरावर मोर होण्याची परिस्थिती कराड तालुक्यातील सर्वच वाळू ठेक्यांवर दिसत असल्याची चर्चा आहे.रावसाहेब वाळू मिळणार तरी कशी..?अशी सर्वसामान्य नागरिकांची आर्त हाक कराड तालुक्यातील वाळू उपशाबाबत सावळागोंधळ दूर करणार का याबाबत नागरिक साशंक आहेत.

रावसाहेब वाळू मिळणार तरी कशी..?


कराड तालुक्यातील वाळू उपशाबाबत सावळागोंधळ

सरकार वाळू सहाशे रुपयांत देणार अशी गोंडस जाहिरात करून शासनाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी अजून एक दालन उपलब्ध करून दिले आहे.मोठा गाजावाजा करीत फोटोसेशन केलेल्या वाळूच्या डेपोवर चुकीच्या व्यक्तींची नजर पडली असून गोर गरीब जनतेला वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे.वाळू खरेदीची नेमकी प्रक्रिया काय याबाबत कोणीही चकार शब्द काढायला तयार नसून रावसाहेब आण्णासाहेब पाकीट घेऊन मूग गिळून बसल्याची तक्रार जनता करीत आहे.चोरावर मोर होण्याची परिस्थिती कराड तालुक्यातील सर्वच वाळू ठेक्यांवर दिसत असल्याची चर्चा आहे.रावसाहेब वाळू मिळणार तरी कशी..?अशी सर्वसामान्य नागरिकांची आर्त हाक कराड तालुक्यातील वाळू उपशाबाबत सावळागोंधळ दूर करणार का याबाबत नागरिक साशंक आहेत.


कराड तालुक्यातील आण्णासाहेब रावसाहेब शिरजोर झाल्याची चर्चा असून इंदोली आणि उंब्रज येथे वाळू ठेका सुरू आहे की बंद याबाबत साधी माहिती सर्वसामान्य नागरिकाला नाही डेपोत असणारा साठा बुकिंगचा आहे अशी भूलथाप तथाकथित डेपोचा मॅनेजर सांगत असल्याची माहिती मिळत आहे.तर दररोज निघणारा नदीपात्रातील माल नक्की कोणाच्या घशात घातला जातो याबाबत उलटसुलट चर्चा आहे.वाळू ठेका कोणाचा आहे यावेळी मोठं मोठ्या राजकारणी लोकांची नावे सांगून सरकारी बाबुच गोरगरीब जनतेला घाबरवून सोडत असल्याची माहिती नागरीक नाव न सांगण्याच्या अटीवर देत आहेत.यामुळे वरकमाई करण्यासाठी सोकावलेली सरकारी यंत्रणा आपल्याच तालात असून काही सरकारी बहाद्दर तर सर्व सामान्य नागरिकांचे फोनही घेत नसल्याचे प्रकार सर्रास घडू लागल्याची माहिती नागरिक देऊ लागले आहेत.


कराड तालुक्यातील महसूल विभागात एजंटांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा मोठ्या चवीने चर्चिली जाऊ लागली आहे.कराड उत्तरेतील एका मोठ्या गावात एका एजंटाणे धुमाकूळ घातल्याची चर्चा खाजगीत सुरू आहे.काही दलाल तर गावकामगार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अरेरावीच्या भाषेत दमबाजी करीत आहेत अशी कुजबुज खुद्द कराड महसूल विभागात आहे.ट्रॅक्टर,जेसीबी अथवा ट्रकवर कारवाई करायची म्हणले तर 'त्यांच्या'जवळ भागवल आहे असा मोठ्या आवाजातील दरडावणीचा सुर येत असल्याने तलाठी कोतवाल मागच्या पावलावर रहात आहे.यामुळे कारवाई कमी आणि वरकमाई जादा अशीच परिस्थिती सध्या कराड तालुक्यात निर्माण झाल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.




पंचनामे,आदेश लाल फितीत


कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा कारवाया नक्की कुठे सुरू आहेत याबाबत निवासी नायब तहसीलदारच अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे.कोणावर कारवाई झाली,कोणाचा आदेश झाला कोण अपिलात गेलं आहे कुणाचा निकाल फेर चौकशीत बदलायचा आहे यासाठी एक विशिष्ट यंत्रणा वर आणि खाली काम करीत असल्याची नागरिक तक्रार करीत आहेत. काहीजण तर आपले दुकानच थाटून बसले असून गेटवरच बकरा अडवला जातो व्यवस्थित फिल्डिंग लावून त्याचा कार्यक्रम करण्याची नवीन पद्धत सध्या रुजू होऊ लागल्याने पंचनामे आदेश लाल फितीत अडकले असून टेबलावरच्या कागदांना टेबल खालील वजन भारी पडू लागल्याची चर्चा जोर धरू लागलीआहे.