उंब्रज / प्रतिनिधी
उंब्रज पोलिसांनी अवैध दारू विक्री व मटका व्यवसायावर मोठी धडक कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. हरपळवाडी, पेरले व उंब्रज गाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही मोहीम नागरिकांत कौतुकास पात्र ठरली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे हरपळवाडी गावाच्या हद्दीत एका घराच्या आडोशाला तुकाराम संपत गायकवाड हा इसम अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती उंब्रज पोलिसांना मिळाली. त्याचप्रमाणे पेरले गावातील एका दुकानाच्या मागील बाजूस शौकत मुबारक मुलानी हा सुद्धा दारू विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ठिकाणी छापा टाकून एकूण 28 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांची बाजार किंमत सुमारे 1,600 रुपये इतकी असून आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
याच दरम्यान, उंब्रज गावात मटका व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उंब्रजमधील एका टपरीवर छापा टाकला असता प्रकाश जयसिंग जाधव (रा. उंब्रज) हा इसम मटका घेताना आढळला. तसेच उंब्रज बाजारपेठ शेजारी राहुल रमेश चव्हाण (रा. लक्ष्मी नगर, उंब्रज) हाही मटका खेळवताना पोलिसांच्या हाती सापडला. दोन्ही ठिकाणांहून 2,720 रुपयांचा रोकड मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी दाखवलेली तत्परता व गोपनीयता विशेष उल्लेखनीय ठरली. चारही आरोपींविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.
उंब्रज पोलिसांनी यापूर्वीही गावातील अवैध धंद्यांवर अनेक वेळा छापे टाकत सातत्याने मोहीम राबवली आहे. परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई एक धडक आणि संदेशात्मक पाऊल ठरल्याचे नागरिकांचे मत आहे.
— “गावात अवैध धंद्यांना ऊत येऊ देणार नाही. अशा इसमांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू राहील,” असा इशारा पोलिस सूत्रांकडून देण्यात आला आहे