उंब्रज/प्रतिनिधी
कराड तालुक्यातील कोर्टी गावातील कदम कुटुंबाने संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार उभा करत आपल्या दोन मुलींना उच्च पदावर पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे दत्तात्रय नारायण कदम यांचे हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. त्यांच्या दोन्ही कन्या वैष्णवी दत्तात्रय कदम आणि कार्तिकी दत्तात्रय कदम या मुंबई पोलीस दलात कार्यरत झाल्याने संपूर्ण कोर्टी गाव, कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोठी मुलगी वैष्णवी कदम हिने एक वर्षांपूर्वी पोलीस भरतीत यश संपादन करत कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले होते. तिच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटी बहीण कार्तिकी कदम हिनेही अवघ्या सहा महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर पोलीस भरतीत यश मिळवत कुटुंबाच्या संघर्षाला सुवर्ण किनार दिली. पुण्यातील योद्धा अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतलेल्या कार्तिकीने अल्पावधीत मिळवलेले हे यश अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दुसऱ्यांच्या वाहनावर रोजगार करत अत्यंत कष्टाने संसार चालवणाऱ्या आई-वडिलांनी मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार कधीच सोडला नाही. मुलींनीही आई-वडिलांचे हाल, संघर्ष आणि त्याग जवळून पाहत अपार मेहनत घेतली. अखेर त्यांच्या जिद्दीला यशाचे पंख लाभले आणि दोन्ही बहिणींनी पोलीस दलात प्रवेश करत कुटुंबाचा अभिमान वाढवला.
“मुलगी शिकली, प्रगती झाली” या विचारांना साजेसं उदाहरण कदम कुटुंबाने समाजासमोर ठेवले आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित होऊन वैष्णवी आणि कार्तिकी या दोन रणरागिनी आज खाकी वर्दीतून समाजसेवेचे कार्य करत आहेत.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या परंपरेला साजेशी शौर्यगाथा आज या दोन बहिणींनी लिहिली आहे. संघर्षाला न घाबरता जिद्दीच्या बळावर यश संपादन करणाऱ्या वैष्णवी आणि कार्तिकी कदम या दोन्ही बहिणी आज अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
एखाद्या वडिलांसाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या लेकरांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान. तोच अभिमान, तेच समाधान आणि तेच आनंदाचे हास्य आज दत्तात्रय कदम यांच्या चेहऱ्यावर झळकत असून कदम कुटुंबाने कराड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शब्दांकन डी डी थोरात