तारळे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकीत कर्जदारावर गुन्हा दाखल

Fri 7th Feb 2025 11:18 pm
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घेतलेल्या ताबा मिळकतीत बेकायदेशीर घुसखोरी, कर्ज भरण्यास टाळाटाळ

तारळे / प्रतिनिधी 

 तारळे ता.पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे थकीत कर्जदार तुषार शामराव देशमुख रा.मरळोशी ता.पाटण व अधिक नामदेव पवार रा.कोंजवडे ता.पाटण यांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्याने कर्जास तारण दिलेल्या मिळकतीचा ताबा सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंडलाधिकारी आवर्डे व तारळे यांनी बँकेचे वसुली विभागाचे अधिकारी यांना घराला सील करून शुक्रवार दि.३१ रोजी दिला होता परंतु संबधित कर्जदारांनी बँकेच्या परवानगीशिवाय ताबा मिळकतीत अनाधिकाराने सीलबंद कुलुप तोडून प्रवेश केल्याचे सोमवार दि.३ रोजी निदर्शनास आल्याने याबाबत तारळे दुरक्षेत्रात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू 
 रिजर्व बँक ऑफ इंडिया यांनी काटेकोर नियमावली अमलात आणल्याने बँक आणि खातेदार या दोघांच्याही हिताचे संरक्षण होण्यास मदत होते बँक प्रशासनाला कर्ज वसुली करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून तातडीने कर्जवसुली सारख्या प्रकरणांना डीआरटी,जिल्हा न्यायालय,जिल्हाधिकारी अशा विविध पातळीवर न्याय मिळण्याच्या तरतुदी असल्याने आता कर्जवसुली सुलभ झाली असून खरंच प्रामाणिक कर्जदारांना यामुळे लाभच झाला आहे.कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्याने बँका अडचणीत येण्याचे प्रकार आटोक्यात आले आहेत.


 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तारळे यांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करीत नियमानुसार कर्जदाराला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्ज परतफेड करण्याच्या पुरेशा संधी दिल्या होत्या अगदी संबधित मिळकत ताबा घेण्यापूर्वी पोलीस संरक्षण घेण्याच्या प्रक्रियेवेळी कर्जदारांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतला होता तसेच तारळे व आवर्डे येथील मंडळ अधिकाऱ्यांनी संबधित कर्जदारांना समक्ष बोलावून जाबजबाब नोंदवले होते कारण सातारा जिल्हाधिकारी यांनी याबाबत तारण मिळकतीचा ताबा बँक ऑफ महाराष्ट्र तारळे शाखेला देण्याचे आदेश निर्गमित केले होते परंतु बँक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कर्जदारांनी केलेल्या विनंतीनुसार आजपर्यंत कठोर कारवाई स्थगित झाली होती परंतु वारंवार सूचना देऊनही कर्जदारांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी बँक प्रशासनाने ताबा घेण्याची कारवाई केली होती यानंतर दोनच दिवसात संबधित कर्जदारांनी बँकेने लावलेले सील तोडून ताबा घेतलेल्या घरात अनाधिकाराने प्रवेश केल्याने बँकेने तारळे दुरक्षेत्रात संबधित कर्जदार तुषार देशमुख व अधिक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आळंदे करीत आहेत