बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; तणावाचे वातावरण

Fri 6th Feb 2026 06:56 pm
- उंब्रज पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल

उंब्रज/प्रतिनिधी

     लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांचे पुतणे बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण झाल्याची घटना पाल जिल्हा परिषद मतदार संघातील जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजनेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी निर्माण झाली होती. पोलिसांनी परस्पर विरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल करून घेतल्या असून राजकीय कारणातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. 

    याबाबत उंब्रज पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जिल्हापरिषद निवडणूक काळात निर्माण झालेल्या राजकीय कारणावरून चोरे (ता. कराड) लगतच्या साखरवाडी परिसरात दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुंकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत  एका तक्रारीत बाळासाहेब वसंतराव साळुंखे रा. चोरे ता. कराड यांनी नमूद केले आहे की, निवडणुकीच्या भेटीगाठी सुरू असताना या कारणावरून झालेल्या वादा दरम्यान समोरच्या गटातील व्यक्तींनी त्यांच्याशी शिवीगाळ केली तसेच दमदाटी केल्याचा प्रकार घडला. हाताने किरकोळ मारहाण केली. 

तर दुसऱ्या तक्रारीत विश्वासराव निवृत्ती काळभोर यांनी म्हटले आहे की, जिल्हापरिषद निवडणूक सुरू असून काही कारणाने राजकीय वादातून समोरच्या बाजूकडून त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले तसेच शाब्दिक वाद झाला. यातून किरकोळ मारहाण केली. 

    घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली. दोन्ही फिर्यादींच्या तक्रारी नोंदवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सदर घटनेबाबत पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील कार्यवाही कायद्यानुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.