कराड विशेष न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
कराड /प्रतिनिधी
हातगाडीवर कपडे विक्री करणाऱ्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग आणि मारहाण केलेप्रकरणी विविध कलमान्वये एकास दोषी पकडून कराड येथील विशेष सत्र न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी ०३ वर्षे सश्रम कारावास व एकूण रक्कम १२,००० रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. अर्जुन यशवंत कुंभार रा. शनिवार पेठ कराड ता. कराड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या
आरोपीचे नाव आहे.
कायद्यासमोर सर्व समान-डॉ.रणजीत पाटील
कराड शहराच्या बस स्टॅन्ड समोर वर्दळीच्या ठिकाणी पती-पत्नीवर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही कठोर पावले उचलली होती, खंडणीखोर फाळकूट दादांवर वचक ठेवली होती, या घटनेचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले, न्यायालयाने देखील आमच्या साक्षी पुराव्याची दखल घेऊन आरोपीस कठोर शिक्षा सुनावली. कायद्यासमोर सर्व समान असतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
याबाबत माहिती अशी की, दि. १८/०३/२०२१ रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे हातगाडयावर कपडे विक्री करत असताना दुपारी २ वाजणेचे सुमारास आरोपी अर्जुन यशवंत कुंभार तिचे गाडयाजवळ आला, त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत सदर ठिकाणी गाडा लावयचा नाही, गाडा लावायचा असल्यास मला र.रु ५००/- दे असे म्हणून फिर्यादी महिलेच्या गाड्यावरील कपडे खाली पाडले सदर घटनेवेळी आरोपी अर्जुन कुंभार हा दारु पिला होता फिर्यादीला आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करुन अश्लील भाषा वापरून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला होता त्याचवेळी फिर्यादीचे पती भांडणाचा प्रकार बघुन भांडणे सोडविण्यासाठी आला असता आरोपीने फिर्यादीच्या पतीसोबत आरोपीने भांडण करून फिर्यादीचे पती जात असताना आरोपीने दांडके घेउन फिर्यादीचे पतीच्या पाठीस व हातास मारहाण करुन फिर्यादी महिलेच्या पतीस गंभीर दुखापत केली होती. म्हणुन फिर्यादीने आरोपीविरुध्द कराड शहर पो.स्टे ने तकार दिल्याने आरोपी विरुद्ध भा.द.वि.क.३८४ ३५४, ३५४ अ, ३२६, ३२३, ५०४, ५०६, सह अ. जा. अ. ज कायदयाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर तपासी अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजीत पाटील यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते, सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांच्या समोर चालू होता. सदरच्या खटल्यात सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ०८ साक्षीदार तपासण्यात आले, सदर खटल्यातील फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांनी न्यायालयासमक्ष जबाब व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व झालेल्या साक्षीवरून मा न्यायालयात गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश दिलीपर भा. पतंगे यांनी दोषी धरून आरोपीला भा. द. वि. सं. कलम. ३५४ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व र.रू. २,०००/- द्रव्यदंडाची, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, भा. द. वि. सं. कलम. ३२६ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व र.रू. १०,०००/- द्रव्यदंडाची, दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. सदर गुन्हयातील जखमी फिर्यादी महिलेचा पती यांना दंड रकमेतून नुकसान भरपाई र. रूपये. ७,०००/- देण्याचा आदेश केला आहे.
सरकार पक्षातर्फे खटला चालविते वेळी कोर्ट पैरवी प्रॉसुकेशन स्कॉड चे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे एस.बी. भोसले, पो.कॉ. कराड शहर पो.स्टे. यांनी सहकार्य केले.
वंचिताला न्याय....
हातगाड्यावर कपडे विकून दिवसभर राब राब राबणाऱ्या पती-पत्नीला कराड बस स्टॅन्ड समोर झालेल्या मारहाणीची त्यावेळी खूप चर्चा झाली होती, परिस्थितीने बिकट असताना देखील या पती-पत्नी न्यायिक लढा देत त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली, तत्कालीन डीवायएसपी डॉ रणजीत पाटील यांनी त्यांना आधार दिला होता, सदरच्या घटनेची दखल घेऊन व झालेल्या पुराव्याचे अवलोकन करून न्यायालयाने केवळ आरोपीला शिक्षा सुनावली नाही तर आरोपीकडून दंड वसूल करून तो जखमी पतीला देण्याचा आदेश ही पारित केला त्यामुळे वंचिताला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.