“सागवानाची तस्करी नव्हे, सहीची दलाली! वराडे येथील वनपाल एसीबीच्या सापळ्यात”

Mon 2nd Feb 2026 10:09 pm
सागवान वाहतुकीच्या परवानगीसाठी ‘हात ओला’

उंब्रज/प्रतिनिधी  


सागवान लाकूड वाहतुकीसाठीची एक सही… आणि त्या सहीसाठी मागितलेली लाच! वराडेमधील वनविभागात सुरू असलेल्या या ‘खुल्या सौद्याचा’ पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी सोमवारी (दि. २ फेब्रुवारी २०२६) धडक कारवाई केली. सापळा इतका अचूक होता की, लाच स्वीकारताच वनपालाला रंगेहात पकडण्यात आले आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.


या प्रकरणी संतोष अनंतराव जाधवर (वय ४४) या वनपालाला अटक करण्यात आली आहे. तो राउंड ऑफिस वराडे, वनपरिक्षेत्र कार्यालय कराड येथे कार्यरत असून सध्या गजानन हौसिंग सोसायटी, कराड येथे वास्तव्यास आहे. सागवानाच्या प्रत्येक घनमीटरमागे ‘दर’ ठरवून लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

तक्रारदार लाकूड व्यावसायिक असून, मौजे साकुर्डी (ता. कराड) येथील शेतकऱ्याची सागाची झाडे अधिकृत परवानगीने तोडण्यात आली होती. मात्र वाहतुकीची अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी वनपालाने थेट लाचेची मागणी केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अखेर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.


पडताळणी कारवाईत धक्कादायक वास्तव समोर आले. १९ घनमीटर सागवानासाठी प्रती घनमीटर ४०० रुपये असा हिशेब मांडत एकूण ७,६०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर रक्कम ७,००० रुपये ठरली. ठरल्याप्रमाणे सापळा रचण्यात आला आणि पंचासमक्ष लाच स्वीकारताच वनपाल जाधवर एसीबीच्या जाळ्यात अडकला.

लाच रक्कम तात्काळ जप्त करण्यात आली असून तळबीड पोलीस ठाणे,येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा करीत आहे.


या थरारक कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पो. हवा. गणेश ताटे, निलेश राजपूरे, पो. शि. सत्यम थोरात व नवनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.सरकारी कार्यालयात लाच मागणाऱ्यांना आता कुठेही आसरा नाही, असा थेट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. लाच मागणी झाल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.