उंब्रज पोलिसांची तात्काळ कारवाई चौघांना अटक
उंब्रज / प्रतिनिधी
उंब्रज ता.कराड पोलिस ठाणे हद्दीत तुळजा भवानी मटण शॉप जवळ पाटण तिकटने येथे युवकास दगडाने मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्यात किरकोळ वादातून चौघांनी एकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री (दि. 21 ऑक्टोबर) घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत चारही आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महादेव शंकरराव चव्हाण (वय 45, रा. पेरले ता. कराड) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा पुतण्या रोहित कृष्णात चव्हाण (वय 25, रा. उंब्रज) हा रात्री सुमारे सव्वा आठच्या सुमारास मोटारसायकलवरून पाटण तिकाटने येथील पेट्रोलपंपाकडून परत येत होता. तुळजा भवानी मटण शॉपजवळ पोहोचताच रस्त्यात चार जण उभे असल्याने त्याने त्यांना बाजूला होण्यास सांगितले.
त्यावरून गणेश ऊर्फ रितेश रमेश चव्हाण, संकेत संतोष चव्हाण, बाबू मोहन आटोळे आणि करण बापू चव्हाण (सर्व रा. लक्ष्मीनगर, उंब्रज) यांनी त्याच्यावर संतापाने हल्ला चढवला. त्यांनी रोहितला मोटारसायकलवरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी आरोपी गणेश ऊर्फ रितेश चव्हाण याने रोहितच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर उंब्रज पोलिसांनी फिर्याद दाखल करत गुन्हा रजिस्टर नंबर 447/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 109(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ठाणेकर यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही आरोपींना काही तासांत ताब्यात घेत अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील तपास PSI ठाणेकर करीत आहेत.