शेजाऱ्याच्याच नराधमाकडून अत्याचाराचा प्रयत्न, विरोधात डोक्यात वरवंटा घालून क्रूर खून
उंब्रज/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर शेजाऱ्याच्याच घरातील नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केला. निरागस मुलीने विरोध केल्याने संतापलेल्या त्या राक्षसाने तिच्या डोक्यात वरवंटा घालून तिची निर्घृण हत्या केली. या अमानुष घटनेने केवळ सासपडे गावच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी आली होती. वडिलांकडून घराची चावी घेऊन तिने दार उघडले. काही वेळानंतर तिचा भाऊ घरी आला असता त्याने घरात भीषण दृश्य पाहिले. त्याची बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. घाबरलेल्या भावाने शेतात काम करणाऱ्या वडिलांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आणि नंतर साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे झपाट्याने फिरवून पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपी राहुल यादव (वय ३४) या नराधमाला अटक केली. तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, आरोपीने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मुलीने विरोध केल्याने त्याने डोक्यात वरवंट्याने घाव घालून तिचा जीव घेतला.
ही बातमी गावभर पसरताच प्रचंड संताप उसळला. शनिवारी सकाळी मुलीचा मृतदेह गावात आणल्यावर शेकडो लोक जमले. संतप्त जमावाने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी करत त्याच्या घरावर दगडफेक केली आणि घरातील पत्रे उचकटून टाकली. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी साताऱ्यातून मोठा फौजफाटा मागवला. लोकांचा रोष एवढा तीव्र होता की, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर गावात गंभीर प्रसंग ओढवला असता.
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी पोलिस प्रशासन आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सर्वाधिक कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर जमाव शांत झाला, परंतु गावातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आणि शोकाकुल आहे.
आरोपी राहुल यादव हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. पोलिसांना असा संशय आहे की, वर्षभरापूर्वी गावात एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला होता, त्या प्रकरणातही याच आरोपीचा हात असावा. या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.
सासपडे गावात मृत मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी सर्वत्र शोककळा पसरली होती. आईवडिलांचा आक्रोश, भावाच्या डोळ्यांतील अश्रू आणि जमलेल्या लोकांच्या “न्याय हवा” या आरोळ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. निरागस मुलीच्या निधनाने गावात भीती, संताप आणि वेदना या तिन्ही भावना एकाच वेळी निर्माण झाल्या आहेत.
ही घटना समाजाच्या मुळावर घाव करणारी आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याच्या चौकटीत सर्वाधिक कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. एक निरागस जीव गेला, पण तिच्या न्यायासाठी उभा राहिलेला समाज हीच तिच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली ठरेल.
सासपडेचे आकाश अजूनही काळवंडले आहे. एका मुलीचा आवाज कायमचा थांबला, पण तिच्या न्यायासाठीचा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रभर घुमतो आहे.