महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अश्लील मेसेज

Tue 17th Mar 2026 07:18 pm
- शिक्षकावर गुन्हा दाखल — उंब्रजमध्ये खळबळ

उंब्रज / प्रतिनिधी

     कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १७) रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही उंब्रज येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी शिक्षक धनाजी तानाजी सावंत (रा. पाप्री, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी १२  मार्च रोजी तिला मोबाईलवरून मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. फिरायला येणार का?, ट्रीपला चल अशा आशयाचे अनेक मेसेज पाठवत त्यांनी विद्यार्थिनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनीने मी तुमची विद्यार्थिनी आहे, असे मेसेज पाठवू नका असे  स्पष्ट सांगूनही आरोपी शिक्षकाने मर्यादा ओलांडत अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवणे सुरूच ठेवले. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने प्रथम ही बाब एका विश्वासातील महिलेला सांगितली आणि नंतर कुटुंबीयांना माहिती दिली.

यानंतर कुटुंबीयांसह विद्यार्थिनीने थेट उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी र.न. 119/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(2) व 78(1)(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे उंब्रज परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिक्षण संस्थां सारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडणे अत्यंत गंभीर असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.